पिवळा पिवळा पाचोळा
₹300
About This Book
अनिल साबळे यांच्या कथा विशिष्ट भौगोलिक परिसर आणि तिथल्या विविध अवकाशांशी घट्ट जोडलेल्या आहेत. हा परिसर मराठी साहित्याला फारसा परिचित नाही. या कथांमधली पात्रं आणि त्यांचे परस्परसंबंध या परिसराशी आत्मीयतेने एकजीव झालेले आहेत. तिथल्या विविध अवकाशांच्या सूक्ष्म तपशिलांच्या ताण्याव्गण्यातून साबळे यांच्या कथेची वीण घडत जाते. पात्रं आणि परिसराचं असं निगडित असणं या कथांना एकसंधता देतं. कथांमधले निसर्गाचे तपशील ताजे आणि रसरशीत तर आहेतच, पण ते फक्त नावीन्यापुरते नाहीत, तर कथांच्या आशयाशी लिप्त आहेत.
या कथांमधली पात्रं किशोरवयीन निवेदकाच्या दृष्टीतून साकारलेली आहेत. त्याच्या अवतीभवती असलेली माणसं आणि त्यांचे एकमेकांच्या आयुष्यावर होणारे परिणाम हा निवेदक त्याच्या वयाला साजेशा भाषेत वाचकाला सांगतो. निवेदकाचं हे जग सुंदर आहे, तसंच क्रूर आहे. त्यात समाजशील आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या शोकांतिका आहेत, तसंच समाजाकडे पाठ फिरवून निसर्गाशी एकरूप होणारी माणसंही आहेत. निरागसता आहे आणि तिचा अंतही आहे. मानवकेंद्री जीवनदृष्टीच्या पलीकडे जाऊन समस्त सजीव-निर्जीव घटकांना जगण्याच्या परिघात सामावणारी करुणा साबळे यांच्या कथांमध्ये सर्वत्र झिरपलेली जाणवते.
साबळे यांच्या कथा मराठी साहित्याच्या मानगुटीवर बसलेल्या सामाजिक-वास्तववादाच्या वर्चस्वाला नाकारून वास्तववादाची एक नवी परिभाषा आपसूकच निर्माण करतात. ही परिभाषा मुद्दाम घडवलेली नाही, तर त्यांच्या जगण्यातून नैसर्गिक सहजतेनं उमलून विस्तारलेली आहे. मराठी वाचकाला सवयीचे नसलेले अनेक नवे, ताजे शब्द या भाषेत आहेत. या भाषेचा नाद आणि लय कथांच्या वाचनानुभवातले महत्त्वाचे घटक आहेत.
अनिल साबळे यांची कथा वाचकाला एका अपरिचित अनागर विश्वात घेऊन जाते. हे विश्व स्वतःचं स्वयंपूर्णत्व नेटाने टिकवून महानगरी ग्राहकवादापासून लांब राहिलेलं आहे. मात्र हे अंतर कमी होत जाण्याचे संकेतही या कथांमधून उमटलेले दिसतात. साबळे यांच्या कथांमधून झालेलं या विश्वांचं दस्तऐवजीकरण म्हणूनच फार महत्त्वाचं आहे.
- निखिलेश चित्रे
Book Images
About the Author
Anil Sabale | अनिल साबळ
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review